Friday, April 12, 2013

नरेंद्र मोदींचा एवढा तिरस्कार का?



नरेंद्र मोदी हे मौत का सौदागर आहेत का? मुस्लीमांच्या २००२ मधल्या शिरकाणाला ते जबाबदार आहेत का? सदर दंगे दुर्दैवी होते नी त्यांना या दंगलींसाठी कसं जबाबदार धरता येईल? गुजरातचा खरंच विकास झालाय का? आणि तो मोदींमुळेच झालाय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा गुजरातचा विकास झाला असेल तर त्याची पुनरावृत्ती मोदी पंतप्रधान झाले तर देशात करू शकतील का? असे मोदीपुराण गेली काही वर्षे व विशेषत: मोदींनी सलग तिस-यांदा गुजरातची निवडणूक जिंकल्यानंतर सुरू झालं आहे. सध्या देशभरात अनेकांना मोदीप्रेमाचा झटका आला आहे, तर अनेकांना विशेषत: तथाकथित सेक्युलरवाद्यांना मोदीविरोधाने पछाडलेलं आहे. तथाकथित सेक्युलरवादी अशासाठी म्हणायचं, की सेक्युलर म्हणजे नक्की काय? त्याच्या कसोट्या काय? आणि कोण सेक्युलर आणि कोण नॉन-सेक्युलर हे कोण ठरवणार आणि ते इतरांनी का मान्य करायचं असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, ज्याची उत्तरं अद्यापतरी समाधानकारकरीत्या मिळालेली नाहीयेत.

तर मुद्दा असा आहे, की मोदींनी सगळ्या प्रकारच्या लोकांना पछाडल्याची स्थिती निश्चित आहे आणि गुजरातच्या निवडणुकांना ज्यापद्धतीने प्रतिसाद देशातून मिळाला ते बघता, प्रेमामुळे वा द्वेषामुळे येत्या निवडणुकांमध्येही मोदीच केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे. मोदींनी गुजरात तर गाजवलं आहेच, पण दिल्लीमध्ये नी कोलकात्यामध्ये त्यांनी केलेली भाषणे, त्यांना सगळ्या थरांतून मिळणारा प्रतिसाद बघता अन्य राज्यांमधली सर्वसामान्य जनता (प्रामुख्यानं मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय) मोदींना अनुकूल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोदी हे नक्की काय रसायन आहे? प्रसारमाध्यमे आणि त्यांचे चाहते आणि त्यांचे विरोधक मोदींचा जप का करताहेत हे बघणं मनोरंजक आहे.

प्रसारमाध्यमांची फरफट...

साधारणत: अशी समजूत आहे की प्रसारमाध्यमं ही स्वतंत्र असतात आणि ती कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. अशी समजूत सरसकट असणं चुकीचं आहे. प्रसारमाध्यमांवर प्रचंड दबाव असतो तो म्हणजे वाचकांचा आणि दर्शकांचा. प्रसामाध्यमे वाचकांची व दर्शकांची मने घडवतात असे अपवादानेच घडते, तर वाचक व दर्शक प्रसारमाध्यमांनी काय दाखवायचं व काय नाही हे रिमोट कंट्रोलच्या आधारे ठरवतात हे वास्तव आहे. जर प्रसारमाध्यमांची भूमिका, त्यांचे विचार आणि कार्यक्रमाची त्यांनी केलेली निवड वाचकांना वा दर्शकांना रुचली नाही तर ते चॅनेल वा वृत्तपत्र बदलतात आणि सवय लागलेली असेल तरच बघतात पण ते ही शिव्या घालत. वेगवेगळ्या पाहण्यांमधून आणि सामान्य ज्ञानातून समजतं की वाचकांना व दर्शकांना काय बघायला हवंय. संपादकांना याची चाहूल लागली की भूमिका काहीही असो, वाचकांच्या / दर्शकांच्या मागे जात जे खपेल ते दाखवावंच लागतं, त्यामुळे म्हटलं की काय दिसेल काय छापून येईल हे रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून वाचक / दर्शक ठरवतात.

याच निकषामुळे ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या त्यावेळी मोदी हे वृत्तपत्रांमधले कॉलम / बातम्या व टिव्हीचा पडदा व्यापून राहतात. मोदी हे चलनी नाणं आहे हे उमजल्यामुळं कुठल्याही पक्षाचा नेता असो, त्याचा संबंध, अभ्यास असो वा नसो, तज्ज्ञ कुणीही असोत, त्यांची इच्छा असो वा नसो, त्यांना विचारलं जातं की मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर होईल का? त्यांना भाजपाला २०० जागा मिळवून देता येतील का? जनता दल मग एनडीएमधून बाहेर पडेल का? वास्तविक पाहता मोदी वा भाजपाच्या नियंत्रणामध्ये देशातलं एकही प्रसारमाध्यम नाहीये. परंतु महाराष्ट्राच्या पातळीवर ज्याप्रमाणे राज ठाकरे चलनी नाणं आहे त्याप्रमाणं नरेंद्र मोदी हे देशपातळीवरील चलनी नाणं आहे. हे प्रसारमाध्यमांनी अचूक ओळखलं आहे, त्यामुळं वैचारीक भूमिका काहीही असोत, जे खपतं ते दाखवावं लागणार या न्यायानं राज ठाकरे व मोदी पडदा व्यापून राहतात. यातली एक गमतीची बाब म्हणजे, ज्यावेळी मोदी समर्थक गुजरातचा विकास झाल्याचे सांगतात त्यावेळी विरोधक व अनेकवेळा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोदींची दंगलीतील संशयास्पद भूमिका आवर्जून मांडतात. मोदींच्या दंगलीच्या काळातल्या भूमिकेचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा आश्चर्य म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातील आमदारांना शिक्षा झाल्यात पण मोदींना अजुनतरी न्यायालयाने दोष दिलेला नाही हे कुणीच कसं सांगत नाही? जर का सलग तिस-यांदा मोदींना निवडून देण्यात आलं असेल, तर दोनपैकी एक तरी बाब या लोकांनी मान्य करायला पाहिजे ना? ती म्हणजे एतकर मोदी आपण समजतो तितके मुस्लीमविरोधी नाहीयेत, किंवा बहुतांश गुजरात हा मुस्लीमविरोधी आहे म्हणून तो मोदींच्या हातात सत्ता देतोय.
अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे मोदींना प्रोजक्ट करण्यामागचं मुख्य कारण चलनी नाणं हे असल्यानं, या अडचणीच्या मुद्दयांच्या अधिक खोलात न जाता तथाकथित सेक्युलर विचारवंत जे म्हणतात त्यांची री ओढणं सोप्पं असतं. म्हणजे एकीकडे टीआरपीही मिळणार आणि दुसरीकडे जातीयवादी असा शिक्काही नाही बसणार!

विरोधकांना मोदींचा एवढा तिरस्कार का?

दंगली बिंगलीचं जरा बाजुला ठेवलं आणि त्यानं काही फारसं साध्य होणार नाही, उलट गुजरातमध्ये झालं तसं बुमरँगच होण्याची शक्यता असल्याचं लक्षात आलं की विरोधकांना मोदींच्या आत दडलेला हुकुमशहा दिसतो. यातही गमतीचा भाग म्हणजे हे तात्पुरतं खरं जरी मानलं तरी, भारतात असा कुठला पक्ष आहे जिथं कुणी ना कुणी आदेश देणारा नाहीये? त्यातल्या त्यात भाजपा हाच पक्ष असेल जिथे पक्षांतर्गत लोकशाही अजुनतरी आहे. गुजरात भाजपामध्ये समजा ती नसेल तर असं गृहीत धरलं तर फार फारतर असं म्हणता येईल की देशातल्या अन्य पक्षांप्रमाणेच मोदींचा गुजरात भाजपा आहे. त्यात एकदम फॅसिस्ट किंवा हुकुमशाही काय आहे. आणि भारताचा स्वातंत्र्यापासूनचा इतिहास बघितला, तर लोकशाहीच्या स्वरुपामध्ये डोक्यावर हुकुमशाही असंच स्वरुप राहिलेलं आहे. जर कठोर नेता वर असेल तर हुकुमशाही म्हणायचं आणि मनमोहन सिंगांसारखा सर्वांना बरोबर नेणारा नेता असेल, तर नेभळट नेतृत्व म्हणायचं असं याचं एकंदर स्वरुप आहे. पण तरीही लक्षात एक गोष्ट येत नाही की भारतात एवढ्या दंगली झाल्या, होत आहेत आणि यापुढेही होणार आहेत ही सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ गोष्ट असताना, मोदींचाच बाऊ का? तोही न्यायालयानं अद्यापतरी कुठला ठपका ठेवलेला नसताना. मुंबईमध्ये १९९२-९३ ला दंगली झाल्या त्यावेळी पोलिसांनी निपक्षपातीपणा दाखवला नसल्याचे अनेक दाखले दिले गेले, तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची सत्ता काढून घेऊन पवारांना मुख्यमंत्री करण्यात आलं, परंतु नाईकांना कधी दंगलींविरोधात जबाबदार धरलं गेलं नाही. दिल्लीतल्या शीखांच्या विरोधात झालेल्या दंगलींनतर तत्कालिन मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्यात आलं नाही आणि टायटलर आदी प्रभृतींविरोधात अजुनही खटल्याचं गु-हाळ सुरूच आहे, शिक्षा नाहीच झालेली. मग असं असताना केवळ मोदींविरोधात न्यायालयाच्या बाहेर ट्रायल का?

या सगळ्याचा विचार केला तर असं दिसतं की नरेंद्र मोदींचा तिरस्कार करणारा मोठ्या प्रमाणावर एक वर्ग आहे. या वर्गाची सेक्युलॅरिझमची स्वताची एक व्याख्या आहे आणि या व्याख्येत न बसणा-यांना तिरस्काराला सामोरं जावं लागेल इतकं ते स्वच्छ आहे. हा तिरस्कार केवळ तथाकथित मुस्लीमांचे मसीहा किंवा मुस्लीमांचे विरोधक अशा मापात बसणारा नाहीये तर त्याची व्याप्ती वेगळ्या प्रकारची आहे. मुस्लीमांच्या विरोधात द्वेषाची भाषा वापरणारे (गंमत म्हणजे जी आजतागायत मोदींनी किमान जाहीरपणे वापरलेली नाहीये) या देशात पुष्कळ आहेत, पण त्यांची फारशी दखल देखील घेतली जात नाही पण मोदीविरोधाचा जप सुरू असतो, मोदींचा प्रचंड तिरस्कार करण्यात येतो असं का? त्याची मला वाटणारी काही कारणं पुढीलप्रमाणे आहेत.

- एक साधं कारण म्हणजे, मोदी यापैकी कुणालाच किंमत देत नाहीत. विरोधकाच्या मताची दखल घेतली आणि भले त्याचं मत खोडून काढायचा प्रयत्न केला तरी विरोधक सुखावतात. पण मोदी निवडणुकांचा अपवादात्मक काळ वगळला तर हे सुख देत नाहीत त्यामुळे विरोधकांची चरफड होते आणि त्यांचा विरोध आणखी बळावतो.
- दुसरं कारण म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळा, अफरातफर, फसवणूक अशा कुठल्याही प्रकारचे आरोप अजूनतरी मोदींवर झालेले नाहीयेत.
- तिसरं कारण म्हणजे ज्या ब्युरोक्रसीमुळे राजकारणी मेताकुटीला येतात ती ब्युरोक्रसी (गुजरातची) मोदींना वश झालेली आहे. ब्युरोक्रसीवर ताबा ठेवणं ही प्रचंड कठीण गोष्ट असते आणि ब्युरोक्रसीच्या कामावर सत्तेवर असलेल्यांच मूल्यमापन होत असतं, त्यामुळं या ब्युरोक्रसीला मोदींनी कह्यात ठेवलेलं अनेकांच्या पचनी पडत नाहीये. इतर कुठल्याच राज्यात असं घडत नसताना ते मोदींनाच कसं काय जमतं यामुळे ही आलेली पोटदुखी असावी.
- चौथं कारण म्हणजे, मोदी ब्राह्मण नाहीत तर अन्य मागासवर्गींयामधून आलेले आहेत, आणि ते कधीही जात-पात आणत नाहीत. मोदींचा उल्लेख कधीही या संदर्भात होत नाही, त्यामुळे चातुर्वण्यवादाचा पुरस्कार करणा-या आरएसएसच्या मुशीतील भाजपावर व त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर या अंगाने टीकाच संभवत नाही.
- पाचवं कारण म्हणजे, उद्योगांचा मोदींना दिवसेंदिवस मिळणारा वाढता पाठिंबा... सगळ्यांना माहितेय की पुढे जायचं असेल तर त्यासाठी उद्योगजगताचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हे अंगही मोदींना वश झालेलं आहे.
- सहावं कारण म्हणजे कितीही हुकुमशाहीचा आरोप केला तरी केशुभाई पटेलांचा अपवाद वगळता, मोदीविरोध गुजरातमध्ये दिसलेला नाही, आणि ज्यांनी विरोध केला त्यांना फारसं काहीही साध्य झालेलं नाही. त्यामुळं एकतर मोदींची हुकुमशाही नसावी किंवा असेलच तर ती बहुसंख्य नेत्यांना मान्य असावी. अशा स्थितीत फार विरोध करता येत नाही आणि आणखी जळफळाट होतो.
- सातवं कारण म्हणजे बदललेल्या राजकारणाचा आणि समाजजीवनाचा ठाव जितक्या सहज मोदींना लागला तितका सहज त्यांच्या विरोधकांना लागलेला नाही. अत्यंत चतुरपणे मोदींनी मध्यमवर्ग, तरुण वर्ग आणि महिला वर्ग आकर्षित केला आणि (हा योगायोग नाही) कुठल्याही धंद्याचा विचार केला तर जिथे हे वर्ग असतात तिथे जाहिरातदार धावतात. बदलत्या अर्थकारणात, राजकारणात या वर्गाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, या वर्गाच्या आकांक्षा मोदींनी ओळखल्या आणि तिथंच न थांबता त्यांना टार्गेट केलं, त्यामुळे शक्यता आहे की विरोधकांचा जळफळाट वाढला असणार. फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं इतकंच त्यांनी तंत्रज्ञान वापरलं नाही तर मल्टिपल लोकेशन थ्री-डी ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून संवाद साधत थेट नव्या युगातल्या लोकांशी त्यांनी नाळ जोडली. जातीपातीचं पारंपरिक राजकारण करणा-यांना व बघणा-यांना मोदींच्या या वेगाचा आवाका न आल्याने तिरस्कार करण्याचा सोयीस्कर मार्ग त्यांनी निवडला असावा.
मोदींचा तिरस्कार विरोधक का करतात याची आणखीही अनेक कारणं देता येतील, पण सध्या इतकी पुरे. मोदी पंतप्रधान होतील की नाही, झाले तर ते चांगलं काम करतील की नाही या सगळ्या वेगळ्या बाजू आहेत, परंतु मोदींच्या निमित्तानं समाज ढवळून निघतोय, चांगलं मिळू शकतं याचा दाखला समाजाला दिसतोय हे महत्त्वाचं.

गुजरातच्या दंगली दुर्दैवी होत्या, मी पक्षाला माता मानतो आणि मातेचा आदेश स्वीकारतो, मी राजकारणी नसून मला पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही, देशहितासाठी पक्ष जे देईल ते काम मी करीन, सामान्य माणसांसारख्या माझ्यातही अनेक उणीवा आहेत, मी हिंदू किंवा मुसलमान कुणा एकासाठी केलेलं नाही जे केलंय ते गुजराती जनतेसाठी, भव्य स्वप्न बघणं आपण बंद केलं म्हणून आपली अधोगती झालीय, आपण मोठी स्वप्न बघुया आणि भारतमातेला जगाच्या नेतृत्वपदी बसवुया अशी भाषा बोलणा-या नरेंद्र मोदींविरोधात एवढा तिरस्कार का असावा? या प्रश्नाचे उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

No comments:

Post a Comment