Thursday, April 4, 2013

आयपीएलच्या बैलाचा ढोल!

समाजामध्ये सदानकदा कशाच्या ना कशाच्या नावे बोटं मोडणारा एक वर्ग असतो. कुठलाही बदल झाला की या वर्गाची तार सटकते आणि आता भल्याची दुनियाच राहिलेली नसून सगळ्या पवित्र गोष्टी सरणावर गेल्याची ओरड हा वर्ग सुरू करतो. वन डे क्रिकेट आलं त्यावेळी कसोटी संपल्याचा कांगावा. टी-20 आलं तेव्हा कसोटी व वन डे दोन्ही संपल्याची बोंब आणि आयपीएल आलं तेव्हा क्रिकेटंच अस्तंगत झाल्याचा जावईशोध लावून हा वर्ग मोकळा झाला. कसोटी क्रिकेट म्हणजे कसं तंत्रशुद्ध, फलंदाज व गोलंदाज दोघांचा कस लावणारं, आणि पाच पाच दिवस एक सामना खेळायचा म्हटल्यावर संयमाची कसोटी बघणारं क्रिकेट अशी ग्राह्य धारणा. तर आयपीएल म्हणजे झट मंगनी पट ब्याह, कसाही फटका मारा, कशीही बोलिंग टाका काम झाल्याशी मतलब, तंत्रशुद्धता गेली बोंबलत असा पक्का समज. आता हे समज कितीसे खरे आहेत हा एक वेगळाच मुद्दा आहे. कारण तथाकथित वेडीवाकडी फलंदाजी करणा-याला तंत्रशुद्ध गोलंदाज पटकन आउट करू शकायला पाहिजे ना? पण तसं होत नाही. ख्रिस गेलसारखा बॅट्समन टी-२० असो, की वन डे असो वा कसोटी असो, सब घोडे बारा टक्के म्हणत सगळ्या गोलंदाजांची त्याच स्टाइलने धुलाई करतो. मलिंगासारख्या गोलंदाजाला ना कसोटीमध्ये धुता येत ना टी-20मध्ये. तर जयवर्धनेसारखा शैलीदार फलंदाज टी-२० मध्येही कसोटीच्याच स्टाइलने फलंदाजी करत प्रत्येकवेळी संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलतो. क्रिकेटचा खेळ मुख्यत: आहे धावा करण्याचा, धावा रोखण्याचा, विकेट घेण्याचा आणि विकेट टिकवण्याचा. काही खेळाडू कसोटीसाठी जास्त उपयुक्त असतील, काही टी-२० साठी तर विराट कोहलीसारखे काही खेळाडू कुठल्याही प्रकारामध्ये चांगलेच खेळतील. प्रश्न खेळाच्या फॉर्मचा नाही, क्रिकेटिंग टॅलेन्टचा आहे. प्रेक्षकांना येणा-या मजेचा आहे आणि बरोबरीनेच क्रिकेटपटुंना मिळणा-या मानधनाचा आहे. कमी वेळेत जर त्यांना जास्त पैसे मिळत असतील तर कुणाच्या बापाचं काय जातं, पण अनेकांची हीच पोटदुखी आहे. बदलत्या काळानुसार टी-२० हा नवा प्रकार आलाय आणि तो चांगलाच यशस्वी होतोय हे या वर्गाला मंजूरच नाहीये. एरवी केवळ २०-२५ खेळाडू करोडपती होत होते आज शेकडो खेळाडुंना संधी मिळत्येय याकडे डोळेझाक कशासाठी करायची? साहित्याच्या प्रांतात असं म्हणतात का, की लघुकथा लिहिताच कामा नयेत. लिहायची तर कादंबरीच लिहा. आणि त्या चारोळ्या वगैरे चालणार नाहीत आणि मुक्तछंदही चालणार नाही. छंदोक्त महाकाव्य लिहिल तोच कवी. असं होत नाही ना! चारोळ्या लिहिल्या जातात, काव्य लिहिले जाते, लघुकथा लिहिल्या जातात आणि पाचसातशे पानांच्या कादंब-याही लिहिल्या जातात. वाचकांना, रसिकांना जे भावतं, ते टिकतं, वाढतं बाकिचं रद्दीत जातं. तसंच आयपीएल हे लोकांना आवडतंय, संध्याकाळच्यावेळी सासू-सुनांच्या भांडणांच्या आणि आमच्या खानदानाच्या नादी लागाल तर निर्वंश करू वगैरेसारखी निर्बुद्ध भाषेच्या सीरियल्स बघण्यापेक्षा हा बॅट आणि बॉलचा थरार कितीतरी पटीने निकोप आहे आणि सहकुटुंब बघण्यासारखा तर आहेच आहे. आयपीएलच्या पावलावर पाऊल टाकत आता कबड्डीसारख्या इतरही अनेक खेळांच्या लीग्ज होऊ घातलेल्या आहेत, हा भाग वेगळाच. पण या नव्या गोष्टींना विरोध करणा-या या विशिष्ट वर्गाचा उल्लेख एवढ्यासाठी केला, कारण ही लोक प्रचंड संख्येनं सगळीकडे पसरलेली आहेत, आणि ती अशी का वागतात हा खरा प्रश्न आहे. स्वभावत:च आपल्यामध्ये एक जडत्व असतं. त्याचबरोबर जुन्या गोष्टींना अकारण श्रेष्ठत्व देण्याचा नी नव्याच्या नावानं बोटं मोडण्याचा देशव्यापी प्रघातही आपल्याकडे आहे. त्यामुळं काही गोष्टी सतत कानावर येत असतात. ओव्हन आणायचा म्हटलं, की गॅसवर काय गरम होत नाही का?, एलईडी घ्यायचा म्हटलं की हा जुना टिव्ही काय वाईट आहे? टॉवर होणार म्हटल्यावर, आधीची चाळंच बरी होती, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कितीही चांगला असला तरी, बोरघाटात गाडी चालवायची मजा काही औरंच, मॅक्डोनल्डचा बर्गर काय खाता, आपला वडापावच बेस्ट, वडापाव चांगला म्हटलं, तर का आईला सांगा की थालीपीठ कर म्हणून, वडापाव कसला खाता? आम्ही भाकरी कांदा आणि लसणाची चटणी यावर मोठे झालो नी तुम्हाला वडपाव पाहिजे. मल्टिप्लेक्स म्हटल्यावर तर अनेकांना ७० रुपयांच्या पॉपकॉर्नच्याच आठवणीने काटा येतो. कितीही चांगली फरशी बसवा, काही जणांची जीभ आमच्यावेळची कोटा फरशीच्या पुढे घसरतच नाही. आता पाठीवर लटकवायच्या सॅकनी किती चांगली सोय केलीय, पण तिलाही अनेकजण नावं ठेवतात आणि शबनमला पर्याय नाही म्हणतात. हा जो सगळा प्रकार आहे ना जडत्वाचा आणि जुनं ते सोनं मानण्याचा, त्याचा प्रभाव कळत न कळत इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यापून राहिलाय, की त्यामुळे देशातल्या प्रचंड लोकसंख्येला बुद्धीमांद्य झालंय की काय असं वाटतं. आपल्या इतिहासाच्या नी भारताच्या दैदिप्यमान परंपरेच्या अतिप्रेमात असलेले तथाकथित राष्ट्रवादी तर सोयीस्कररीत्या हे देखील विसरतात, की आज आपण जे जगतोय, त्यातला ऐहिक जीवनातला जो काही चांगला भाग आहे, तो प्रत्येक भाग गो-या साहेबांच्या संशोधनामुळे, त्यांनी केलेल्या तंत्रज्ञाना्या विकासामुळे आपण जगतोय. साधे संडास बांधायची बुद्धी आपल्याला नव्हती, त्यामुळे अगदी सकाळच्या प्रात:विधीच्या सोयीपासून ते गुड-नाईटपर्यंतची प्रत्येक चांगली कल्पना आपण आयात केलेली आहे. पण हे सगळं विसरून आपण म्हणणार काय तर भारत हा सॉलिडच देश होता आणि या गो-यांचं अनुकरण केल्यामुळे आपली अधोगती झाली. आयपीएलला नावं ठेवणं आणि गो-यांना शिव्या घालणं, पूर्वजांचा उदो-उदो करणं या वेगळ्या गोष्टी वरवर वाटतील पण त्यात सूक्ष्म साम्य आहे. ते म्हणजे बदलाला विरोध आणि जैसे थे चं स्वागत! काही हजार वर्षांपूर्वीच्या भारताच्या सुवर्णयुगातून आपण अद्याप बाहेरच आलेलो नाहीत. परकीय आक्रमणांनी हतबुद्ध झालेला आणि नवनिर्मितीची आस गमावून बसलेला भारत एकीकडे पाश्चिमात्यांच्या प्रभावाखालील सर्व ऐहिक उपभोग भोगत जगतोय आणि विरोधाभास म्हणजे दुसरीकडे प्रत्येक नव्या गोष्टीला बोटं मोडत जुनंच कसं चांगलं होतं याचे पाढे वाचतोय. टी-२० हा एकदम बोगस प्रकार आणि त्यामुळे कसोटी क्रिकेट लयाला जाण्याचा बागुलबोवा दाखवण्याची वृत्ती इतक्यापुरतं त्याचं स्वरुप असतं, तर विषय तितका गंभीर नसता. परंतु हे तर फक्त लक्षण आहे. त्याची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. आयपीएल राहू दे बाजुला, पण कुठल्याही नव्या गोष्टीचं स्वागत आपण कसं करतो, बुद्धीचा नीट वापर करून करतो का, योग्य काय अयोग्य काय याच्या निकषावर तोलतो का, सगळ्या अंगांनी ब-यावाईटाचा विचार करतो का, क्षणभर भावना बाजुला ठेवून निरपेक्षपणे नव्या गोष्टीची व तत्संबंधीच्या जुन्या गोष्टीची आपण चिकित्सा करतो का? का नवी गोष्टी दिसली की घेतली डोक्यावर किंवा केला लागलीच विरोध आणि जुन्याचाच केला जयजयकार असं आपण करतो? ही दोन्ही टोकं वाईटंच. आयपीएलचं निमित्त आहे, पण या वर्गाचं वागणं काही तितकं ठीक नाही दिसत हे सांगणं महत्त्वाचं!

No comments:

Post a Comment