
गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे सचिनच्या निवृत्तीविषयी. ज्यांनी कधी हातात बॅटही धरलेली नाही आणि ज्यांचा पबमध्ये नाचण्याव्यतिरिक्त पाय हलवण्याशी संबंध नाही असे महाभाग सचिनच्या फूटवर्कविषयी तारे तोडतात त्यावेळी हसावं की रडावं हे कळत नाही. सचिनचे विक्रम बघून ज्यांचं पोट भरलेलं नाही त्यांना दोन वर्षात त्यानं एक शतक झळकावलेलं नाहीये हे दिसतं किंवा एखाद्या मॅचमध्ये भारताला जिंकून देण्यास तो अपयशी ठरल्याचं आठवतं. आता साधी गोष्ट आहे सचिननं निवृत्ती स्वीकारावी की नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहेच, त्याचप्रमाणे त्याला टीममध्ये घ्यावं की नाही हा निवडसमितीचा प्रश्न आहे. जर का निवडसमितीला वाटलं की सचिनचा परफॉर्मन्स टीममध्ये स्थान देण्याएवढा नाहीये, तर त्यांनी त्याला बसवावं की संघाबाहेर. सौरभ गांगुली असाच गेलाय टीमबाहेर!
पण खरंतर सचिननं रिटायर्ड व्हावं की नाही हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की सचिनचं खरं महत्त्व आपण ओळखलंय का? सचिननं नक्की भारताला काय दिलंय याची आपल्याला जाणीव आहे का? सचिन अपयशी ठरला तरी त्याला शिव्या घालणा-याला मारायला उठणा-या फॅन्सच्या मनात सचिनचं स्थान काय आहे, हे आपल्याला कळलंय का? सचिननं क्रिकेटच्या पलीकडे भारताला बरंच काही दिलीय याची आपल्याला जाणीव आहे का? माझ्यामते, सचिनचं भारतीय क्रिकेटला दिलेलं योगदान हा फजूल प्रश्न असून सचिननं भारताला दिलेलं योगदान, त्यानं भारतीयांना दिलेला आनंद, निराशेने ग्रासलेल्या सामान्यांना दिलेला आत्मविश्वास, आणि आपल्या साध्या - स्वच्छ चारीत्र्यानं महान व्यक्तींचे पायपण जमिनीवर असू शकतात हा दिलेला संदेश या महत्त्वाच्या बाबी आहेत. सचिनच्या फॅन्सना सचिन आपल्याला का आवडतो हे तो कमी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर सांगता येत नसेल पण त्याच्या आत्यंतिक प्रेमातून हे नक्की समजतं, की त्याची सचिनवरची निष्ठा केवळ महाशतकामुळे किंवा शेन वॉर्नला मारल्यामुळे नाहीये, तर ती निष्ठा कुठेतरी त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाशी निगडीत आहे. यशाच्या शिखरावर असताना डोक्यावर घ्यायचं आणि अपयशी ठरल्यावर त्याच वेगानं जमिनीवर आपटायचं ही भारतीयांची साधारण वृत्ती आहे, पण सचिन हा अपवाद आहे कारण सर्वसामान्य जनता सचिनला नेहमीच्या यशा-अपयशाच्या मोजपट्ट्या नाही लावत. ज्याप्रमाणे कसाही वेडाबिद्रा असला तरी आईला आपलं पोर प्यारं असतं, तसंच काहीसं स्थान सचिननं सर्वसामान्य भारतीयांच्या मनात मिळवलंय. सचिनच्या शतकानं भारत डोलतो, त्याच्या लवकर बाद होण्यानं भारत पाणावतो. फर्स्ट क्लास मिळाला तर आई पेढे वाटते, पण पोर नापास झालं, तर मायाळू आई म्हणते, पुढच्या वेळी पास होशील बाळा, काळजी करू नको, आत्ता खाऊन घे! खरा सचिनप्रेमी याच ममत्वानं सचिनकडे बघतो, त्याला दु:ख झालेलं असतं, पण त्याला सचिनचा राग आलेला नसतो. त्यामुळे सचिनच्या थोड्या फार अपयशानं सर्वसामान्य भारतीय व्यथित होतो, परंतु त्याला लगेच त्याची सांगड निवृत्तीशी घालावीशी नाही वाटत. फार थोड्या लोकांच्या वाट्याला असं सुख येतं. अशांमध्ये फार म्हणजे फार थोड्यांचा समावेश करता येईल. सचिनला हे स्थान का मिळालं असेल याच्या उत्तरामध्ये चाळिशी पार केलेला आणि निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या सचिनबाबत अजूनही बहुतांश जनतेला ममत्त्व आहे हे कळेल.
पाकिस्तानमध्ये वासिम अक्रम, वकार युनूस आणि अब्दुल कादीर सारख्या दिग्गजांसमोर अवघ्या सोळा वर्षांच्या सचिननं पदार्पण केलं आणि अवघ्या क्रीडाजगतामध्ये त्याचा बोलबाला झाला. सचिनमध्ये आपल्याला उद्याचा स्टार दिसला. सगळं जग त्याच्या धाडसी वृत्तीच्या प्रेमात पडलं. पण हे प्रकरण एवढ्यावर संपत नाही. तर खरी गोष्ट अशी आहे की जावेद मियाँदादने १८ एप्रिल १९८६ या दिवशी शारजाहमध्ये चेतन शर्माला षटकार लगावून केवळ शर्माच्या कारकिर्दीचा विराम केला नाही तर संपूर्ण भारताच्या इच्छा-आकांक्षांना लकवा मारला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्धापुढे इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस सीरिज किरकोळ वाटायला लागल्या. आणि मियाँदादच्या त्या षटकाराचा धसका इतका प्रचंड होता की त्याचे पडसाद आजही कानावर येतात. भारतीय क्रिकेट संघाला त्यानंतर जो लकवा भरला तो भरून यायला खूप वर्षे लागली. शारजामधल्या त्या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला आणि ६-१ असा दणदणीत पराभव करून गेला. त्यानंतर पाकिस्तान भारताची मिळेल तिथे धुलाई करत होता. सचिन आला आणि त्याच्यामुळे काही लगेच आपण पाकिस्तानला मारायला लागलो असं झालं नाही, पण पाकिस्तानमध्ये जाऊन अक्रम, वकार, कादीरच्या डोळ्याला डोळा भिडवून ताठ मानेनं उभं राहण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे, हा जो जबर आत्मविश्वास सचिननं दिला, तिथं पहिल्यांदा तो भारतीयांच्या गळ्यातला ताईत झाला. जवळपास प्रत्येक भारतीयाला जणू असं वाटत होतं, की अब्दुल कादीरला मारलेले ते तीन षटकार मीच मारले आहेत.
त्यानंतर, सचिनभोवती जे वलय तयार झालं ते फक्त क्रीडाप्रेमींमध्ये नव्हतं तर संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये होतं. भारतात कितीतरी क्रिकेटपटू मोठे झाले, पण कधी बाईच्या मागे तर कधी बाटलीच्या मागे ते लागले आणि म्हणता म्हणता ते रसिकांच्या मनातून उतरले. ज्या अब्ज लोकांनी सचिनच्या खांद्यावर विश्वासाची मोहर उमटवली ती त्यानं प्राणपणानं जपली, आपल्या मैदानाबाहेरच्या मर्यादाशील वागण्यानं त्यानं रसिकांच्या मनावर राज्य केलं. क्रिकेट जर स्वयंपाकघरात घुसायचं कारण काही असेल तर ते सचिन तेंडुलकर आहे. प्रक्येक आईला वाटायचं आपला मुलगा सचिन व्हावा, प्रत्येक बहिणीला वाटायचं भाऊ सचिनसारखा हवा. राजकारणी धूर्तपणामुळे नाही तर उपजत वृत्तीमुळे सचिन मुलींसाठी हॉट नाही ठरला पण हवाहवासा वाटणारा ठरला. त्याला कधी रक्तानं भरलेली प्रेमपत्रे आली नसतील, पण क्रिकेट म्हणजे सचिन हे वाक्य भारतातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात कोरलं गेलं.
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा माज उतरवणं असो, कुठल्याही वादात न पडता मोजकं तेवढंच बोलण्याची वृत्ती असो, करोडो रुपयांचा धनी असूनही जुन्या गोतावळ्यात, घरांमध्ये रमणारे संस्कार असोत, नाईट पार्टींमध्ये धुडगूस न घालता आपल्या खोलीत संगीताचा आस्वाद घेत बसण्याची निवड असो वा उगाच बभ्रा न करता अबोलपणे चाललेलं समाजकार्य असो, सचिन दिवसागणीक भारतीयांच्या रक्तामध्ये उतरत गेला. सचिन म्हणजे कुणी वेगळा नाहीये, आपल्याच आशा-आकांक्षांचं ते मूर्त रुप आहे, तो म्हणजे होऊ न शकलेलो आपणच आहोत ही भावना करोडो रसिकांनी तब्बल दोन दशकं अनुभवली. वेश्यावस्तीमध्येही जशी एखादी स्त्री पतीव्रता राहू शकते, तितकी अलिप्तता सचिननं संपूर्ण ग्लॅमरचं आणि सत्तेचं विश्व पायाशी लोळण घेत असता राखली आणि लालसेनं, भ्रष्टाचारानं, जीवघेण्या स्पर्धेनं, मॅच फिक्सिंगच्या प्रकारामुळं आणि बड्यांकडून होणा-या सततच्या हाडतुडीनं त्रस्त झालेल्या भारतीयांना ती पहिल्या पावसाच्या शिडकाव्यासारखी वाटली.
सचिनला लाभलेल्या प्रेमामध्ये केवळ त्याच्या शतकांचा समावेश नाहीये, तर या आणि अशा शेकडो गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत. भारतामध्ये ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून, ज्येष्ठ गायक म्हणून, ज्येष्ठ समाजसेवक म्हणून, ज्येष्ठ कलाकार म्हणून अनेकांच्या पुढे भारतीय नतमस्तक होतील. पण सचिनसाठी एवढं पुरेसं नाहीये. सरकारने अद्याप न दिलेला भारतरत्न हा पुरस्कार तमाम भारतीयांनी सचिनला केव्हाच बहाल केला आहे. तो कधीही निवृत्त होवो, कितीही वेळा शून्यावर बाद होवो, त्याच्यामुळे सामना भारत जिंको वा ना जिंको, सचिनवरील प्रेम अबाधित राहण्यासाठी त्याचं भविष्यातील योगदान नाही तर भूतकाळातील सचिन रमेश तेंडुलकर हे व्यक्तिमत्त्व पायाभूत आहे, आणि त्यात काही बदल संभवत नाही!





